सीमेपलीकडील दहशतवाद थांबवा, तरच सिंधू पाणी वाटप करारावर विचार; भारताचा पाकिस्तानला सज्जड इशारा

नवी दिल्ली: पाकिस्तानकडून सुरू असलेल्या सीमेपलीकडील दहशतवादाचा निषेध करत, भारताने ‘इंडस वॉटर ट्रीटी’ (सिंधू पाणी वाटप करार) बाबत आपली भूमिका पुन्हा एकदा स्पष्ट केली आहे. पाकिस्तानने दहशतवादाला पाठिंबा देणे त्वरित आणि कायमचे थांबवावे, तरच या कराराबाबत सकारात्मक विचार केला जाऊ शकतो, असे परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी स्पष्ट केले.
तिस्ता नदी प्रकल्प आणि बांगलादेश: बांगलादेशातील
‘तिस्ता नदी सर्वसमावेशक व्यवस्थापन आणि पुनर्संचयित प्रकल्पा’वर भाष्य करताना जयस्वाल म्हणाले की, भारत बांगलादेशाला देत असलेले विकास सहाय्य हे दोन्ही देशांच्या परस्पर संमतीने ठरलेल्या रोडमॅपवर आधारित आहे. या प्रकल्पाबाबत भारताची भूमिका बांगलादेशला आधीच अवगत करण्यात आली असून, भविष्यातील सर्व घडामोडी लक्षात
घेऊनच भारत आपली पुढील रणनीती आखेल.
व्हेनेझुएलातील भारतीय खलाशाचे प्रकरण: व्हेनेझुएलातून
मायदेशी आणलेल्या एका भारतीय खलाशाच्या मृतदेहातील महत्त्वाचे अवयव गायब असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या गंभीर प्रकरणाची दखल घेत भारताने व्हेनेझुएला प्रशासनाशी संपर्क साधला आहे. या प्रकरणाची तातडीने आणि सखोल चौकशी करण्याची विनंती भारताने व्हेनेझुएला सरकारला केली आहे, असेही परराष्ट्र मंत्रालयाने सांगितले.



