फटाका सायलेंसरचा धिंगाणा; काळेपडळ पोलिसांची धडक कारवाई, ११ बुलेट जप्त

पुणे : मध्यरात्री फटाका सायलेंसरचा कर्णकर्कश आवाज करत नागरिकांमध्ये दहशत निर्माण करणाऱ्या दुचाकीस्वारांविरोधात काळेपडळ पोलिसांनी धडक कारवाई करत ११ बुलेट दुचाकी जप्त केल्या. या प्रकरणात वाहनचालकांबरोबरच मॉडिफाईड सायलेंसर बसविणाऱ्या गॅरेज चालकांवरही गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
३१ जुलैच्या रात्री ११ ते १ ऑगस्टच्या पहाटे ५ वाजेदरम्यान कोंढवा, न्याती चौक, रहेजा व्हिस्टा चौक, उंड्री आणि मोहम्मदवाडी परिसरात काही तरुणांनी मॉडिफाईड सायलेंसरच्या साहाय्याने फटाक्यासारखा मोठा आवाज करत भरधाव दुचाकी चालवल्या. या प्रकारामुळे परिसरातील नागरिक, ज्येष्ठ नागरिक आणि लहान मुले दचकून जागी झाली. नागरिकांनी पोलिसांकडे तक्रारी केल्यानंतर विशेष मोहीम हाती घेण्यात आली.
तांत्रिक विश्लेषण, गुप्त माहिती आणि तपासाच्या आधारे पोलिसांनी संबंधित वाहनचालकांचा शोध घेत त्यांच्यावर भारतीय न्याय संहिता आणि मोटार वाहन कायद्यातील विविध कलमान्वये गुन्हे दाखल केले. कारवाईदरम्यान ११ बुलेट दुचाकी जप्त करण्यात आल्या. जप्त वाहनांवरील बेकायदेशीर फटाका सायलेंसर काढून नष्ट करण्यात आले.
तपासादरम्यान फटाका सायलेंसर बसविणाऱ्या गॅरेज चालकांचाही सहभाग उघड झाल्याने त्यांच्यावरही कारवाई करण्यात आली. अशा प्रकारे ध्वनीप्रदूषण आणि दहशत निर्माण करणाऱ्या इतर वाहनचालकांचा शोध सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.
ही कारवाई वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली काळेपडळ पोलिसांच्या विशेष पथकाने केली. सार्वजनिक शांततेला बाधा आणणारे आणि वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांविरोधात अशी कारवाई यापुढेही सुरू राहणार असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले.



