भारतीय ज्ञान आधुनिक विज्ञानाच्या कसोटीवर सिद्ध करून जगासमोर मांडण्याची गरज
डॉ. भूषण पटवर्धन यांची अपेक्षा

पुणे : सध्या शिक्षणात पाश्चात्य ‘मोनोकल्चर’चा प्रभाव वाढला असून,आहार,विहार आणि विचारांतून भारतीयत्व हरवत चालले आहे.भारतीय ज्ञान आधुनिक विज्ञानाच्या कसोटीवर सिद्ध करून जगासमोर मांडण्याची गरज आहे. मानव्यशास्त्रात जागतिक दर्जाच्या संस्था भारतात उभ्या राहायला हव्यात आणि डेक्कन कॉलेजमध्ये ते सामर्थ्य आहे,असे डेक्कन अभिमत विद्यापीठाचे कुलपती डॉ. भूषण पटवर्धन यांनी येथे सांगितले.
कर्वेनगर येथील कमिन्स अभियांत्रिकी महाविद्यालयातील के.बी. जोशी सभागृहामध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या छत्रपती संभाजी भागाच्या वतीने आयोजित ‘संघ शताब्दी मंथन’ कार्यक्रमात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे भारतीय प्रचार प्रमुख सुनील आंबेकर मुख्य वक्ते होते. यावेळी व्यासपीठावर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे अखिल भारतीय संपर्क विभागाचे कार्यालय प्रमुख प्रणव पवार आणि छत्रपती संभाजी भागाचे संघचालक अनिल व्यास यांची उपस्थिती होती. त्यावेळी डॉ. पटवर्धन बोलत होते.
समाजाचा पाठिंबा हाच संघकार्याचा आधार असल्याचे नमूद करून सुनील आंबेकर म्हणाले, “संघ स्वयंसेवकांची साधना ओळखून समाजाने विपरित परिस्थितीत संघाला साथ दिली.आता व्यक्ति निर्माणाचे कार्य प्रत्येक कुटुंबात पोहोचणे आवश्यक आहे.केवळ संघाच्या भरवशावर समाजपरिवर्तन शक्य नाही; त्यासाठी समाजाचा सक्रिय सहभाग अनिवार्य आहे.समाजाचे अवलंबित्व कमी करून स्वावलंबी व्यवस्था निर्माण करणे हेच संघाचे ध्येय आहे.” मुस्लिम प्रश्न हा संघाच्या स्थापनेपूर्वीपासून असून,संघ तो सोडवण्यासाठी सातत्याने प्रयत्नशील असल्याचेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.



