मुंबई

भारतीय शेअर बाजाराला मोठा झटका; १५ दिवसांत ६२ हजार कोटींची विदेशी गुंतवणूक बाहेर!

मुंबई:डॉलरच्या तुलनेत रुपयाचे कोसळणारे मूल्य, वाढता भू-राजकीय तणाव आणि जागतिक अर्थव्यवस्थेतील अस्थिरतेमुळे भारतीय शेअर बाजारातून परदेशी गुंतवणूकदारांनी (FPIs) आपला पैसा मोठ्या प्रमाणावर काढून घेण्यास सुरुवात केली आहे. जून २०२६ च्या पहिल्या पंधरवड्यात परदेशी गुंतवणूकदारांनी तब्बल ६२,८५३ कोटी रुपयांचे शेअर्स विक्रीस काढल्याने भारतीय बाजारपेठेत खळबळ उडाली आहे.

नॅशनल सिक्युरिटीज डिपॉझिटरी लिमिटेडच्या (NSDL) ताज्या आकडेवारीनुसार, २०२६ च्या अवघ्या साडेपाच महिन्यांत विदेशी गुंतवणूकदारांनी भारतीय बाजारातून २.८७ लाख कोटी रुपये काढून घेतले आहेत. विशेष म्हणजे, ही विक्री संपूर्ण २०२५ वर्षातील एकूण १.६६ लाख कोटी रुपयांच्या विक्रीपेक्षाही कितीतरी पटीने जास्त आहे.

गुंतवणूकदार ‘सुरक्षित’ पर्यायांकडे आकर्षित

या मोठ्या विक्रीच्या ट्रेंडवर भाष्य करताना मॉर्निंगस्टार इन्व्हेस्टमेंट रिसर्च इंडियाचे प्रिन्सिपल मॅनेजर हिमांशू श्रीवास्तव म्हणाले की, “जागतिक स्तरावर व्याजदरांबाबतची अनिश्चितता, भू-राजकीय तणाव आणि आर्थिक मंदीच्या भीतीमुळे गुंतवणूकदार जोखमीचे व्यवहार टाळत आहेत. यामुळेच उदयोन्मुख बाजारपेठांमधून भांडवल काढून ते विकसित आणि तुलनेने सुरक्षित मानल्या जाणाऱ्या बाजारांकडे वळवले जात आहे.”

अर्थव्यवस्थेपुढील आव्हाने

भारत हा मोठ्या प्रमाणात तेल आयात करणारा देश असल्याने, परकीय चलनाची स्थिरता देशाच्या अर्थव्यवस्थेसाठी अत्यंत महत्त्वाची आहे. आर्थिक वर्ष २०२६-२७ मध्ये देशाचा ‘बॅलन्स ऑफ पेमेंट’ तुटवडा सुमारे ६० अब्ज डॉलरपर्यंत जाण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर केंद्र सरकार आणि रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) विदेशी भांडवल आकर्षित करण्यासाठी विविध उपाययोजना करत आहेत. मात्र, विदेशी गुंतवणूकदारांच्या सातत्यपूर्ण विक्रीमुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर मोठे आव्हान निर्माण झाले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

You cannot copy content of this page