विकास लवांडे यांच्यावरील हल्ल्याचा राष्ट्रवादी काँग्रेस (शप) कडून निषेध

मुंबई: ह.भ.प. विकास लवांडे महाराज यांच्यावर झालेला भ्याड हल्ला हा केवळ एका व्यक्तीवरील हल्ला नसून तो वारकरी संप्रदायाच्या विचारांवर, संविधानिक अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर आणि महाराष्ट्राच्या संत परंपरेवर केलेला हल्ला आहे. काळे फासणे, धक्काबुक्की करणे, पिस्तूल दाखवून धमक्या देणे ही कोणत्या धर्माची संस्कृती आहे? ,असा प्रश्न राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेश प्रवक्ते,
ॲड. अमोल मातेले यांनी उपस्थित केला.
राज्यात कायदा आणि सुव्यवस्था आहे की काही गुंडांच्या टोळ्यांचे राज्य आहे? पोलिसांनी नेहमीप्रमाणे बघ्याची भूमिका न घेता तात्काळ कठोर कारवाई करावी. अन्यथा जनतेच्या संतापाला सामोरे जावे लागेल. महाराष्ट्रातील पुरोगामी विचारांना दडपण्याचा प्रयत्न कोणी करत असेल तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार पक्ष रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही.
वारकरी संप्रदायाची प्रतिमा मलिन करणाऱ्या आणि महाराष्ट्राच्या सामाजिक सलोख्याला गालबोट लावणाऱ्या प्रवृत्तींना समाजाने ओळखले पाहिजे. संतांच्या नावावर दुकानदारी करणाऱ्यांनी आधी संतांचे विचार वाचावेत, असे ॲड. अमोल मातेले यांनी म्हटले आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार वारकरी संप्रदाय हा महाराष्ट्राच्या संस्कृतीचा, संत परंपरेचा आणि समतेच्या विचारांचा आत्मा आहे. संत ज्ञानेश्वर, तुकाराम महाराजांनी दिलेला मानवतेचा संदेश आजही लाखो वारकऱ्यांच्या माध्यमातून समाजात पोहोचत आहे. मात्र काही स्वयंघोषित धर्मरक्षक आणि विकृत मानसिकतेचे लोक वारकरी संप्रदायात घुसखोरी करून या पवित्र परंपरेची बदनामी करण्याचे कटकारस्थान रचत आहेत, ही अत्यंत गंभीर बाब आहे, असे त्यांनी सांगितले.
संतांच्या नावावर हिंसाचार करणारे हे लोक वारकरी नसून समाजात तेढ निर्माण करणारे भाडोत्री प्रवृत्तीचे लोक आहेत.
ज्यांना संतांचा वारसा समजला नाही, तेच आज भगव्या वस्त्रांच्या आडून द्वेषाचे राजकारण करत आहेत. वारकरी संप्रदायात शिरून समाजात विष पेरण्याचे काम करणाऱ्या या तथाकथित धारकऱ्यांचा आम्ही जाहीर निषेध करतो. संतांच्या महाराष्ट्रात विचारांना उत्तर विचारांनी द्यायचे असते, गुंडगिरीने नाही,असे त्यांनी नमूद केले.



