
नागपूर : शून्य सावली दिवस हा शब्दच कुतूहल निर्माण करणारा आहे कारण या दिवशी आपली वर्षभर सोबत राहणारी सावली काही मिनिटासाठी सोडून जाते. कोणतीही उभी वस्तू ठेवल्यास,मनुष्य उन्हात सरळ उभा राहिला तर सूर्य अगदी डोक्यावर आला असताना सावली दिसत नाही. या नैसर्गिक आविष्काराला शून्य सावली दिवस म्हटले जाते.१३ मे रोजी पुणे,मुळशी, लवासा, दौंड, लातूर, असरल्ली या ठिकाणी शून्य सावली दिवस असेल.
भारतात २३.५० अंशाच्या पुढे दिल्ली,हिमाचल, काश्मीर कुठेही शून्य सावली हा निसर्गाचा आविष्कार घडत नाही. महाराष्ट्रात ३ मे ते ३१ मे पर्यंत शून्य सावली दिवस येतात.
शून्य सावली दिवस हा क्षण आणि दिवस केव्हा आणि कुठे , कसा घडतो याची माहिती अशी: सूर्याचा उत्तरायण आणि दक्षिणायन असा भासमान मार्ग पृथ्वीच्या २३.५० अक्षांश दक्षिण आणि उत्तरेकडे असतो म्हणजेच कर्कवृत्त आणि मकरवृत्त ह्या दरम्यान असणाऱ्या सर्व भूभागावर सूर्य वर्षातून दोनदा दुपारी डोक्यावर येतो आणि दोनदा शुन्य सावली दिवस येतात. उत्तरायण होताना एकदा आणि दक्षिणायन होताना एकदा.तसेच सूर्य दर रोज ०.५० अक्षांश सरकतो म्हणजे तो एकाच अक्षवृत्तावर २ दिवस राहतो,त्यामुळे एकाच ठिकाणावरून दोन दिवस शून्य सावली अनुभवता येऊ शकते.
भारताचा विचार केल्यास अंदमान-निकोबार बेटावर इंदीरा पॉइंट येथे ६.७८° अक्षवृत्तावर ६ एप्रिल आणि ५ सप्टेंबर रोजी दुपारी सूर्य अगदी डोक्यावर असतो आणि शून्य सावली दिवस घडतो.पुढे १० एप्रिल आणि १ सप्टेंबर रोजी कन्याकुमारी येथे शून्य सावली दिवस येतो तो दक्षिण भारतात तेलंगणा येथे २ मे पर्यंत विविध अक्षवृत्तावर असलेल्या शहरात शून्य सावली दिवस पाहता येतो.
महाराष्ट्रात ३ मे ते ३१ मे पर्यंत शून्य सावली दिवस येतात. कोल्हापूर जिल्ह्यातील सावंतवाडी येथे ३ मे रोजी तर धुळे जिल्ह्यात ३१ मे रोजी शून्य सावली दिवस अनुभवता येतो. भारतातून शेवटी मध्यप्रदेशातील भोपाळ जवळून २३.५० ° अंशावरून कर्कवृत गेले आहे,त्यामुळे शून्य सावलीचा हा भारतातील शेवटचा भूभाग आहे.
महाराष्ट्रातील कोल्हापूर जिल्ह्यात १५.६° अक्षांश ते धुळे जिल्ह्यात २१.९८ ° अक्षांश ह्या दरम्यान शून्य सावली दिवस पाहता येणार आहे. एका अक्षांशावर येणाऱ्या सर्व परिसरात त्याच दिवशी शून्य सावली दिवस येतात.
महाराष्ट्रातील वेगवेगळ्या अक्षवृत्तावर वेगळे दिवस आणि वेळा आहेत,त्यामुळे सर्व शहरे आणि गावांच्या वेळात काही सेकंदांचा फरक आहे,त्यामुळे दुपारी १२.०० ते १२.३५ ह्या वेळा दरम्यान सूर्य निरीक्षण करावे.
चंद्रपूर येथील स्काय वाॅच ग्रुपचे अध्यक्ष,
खगोल अभ्यासक प्रा. सुरेश चोपणे (९८२२३६४४७३) यांनी अधिक माहिती देताना सांगितले की समूहासाठी उपक्रम करायचा असेल तर मोकळ्या जागी आणि कौटुंबिक निरीक्षण करायचे असेल तर घराच्या छतावर किंवा अंगणात केले तरी चालेल. कोणतीही उभी वस्तू,मनुष्य उन्हात सरळ उभी ठेवावी. सूर्य अगदी डोक्यावर आला की सावली दिसत नाही.
महाराष्ट्रात ३ ते ३१ मे दरम्यान शून्य सावली दिवस असून ते वेळापत्रक पुढीलप्रमाणे:
३ मे सावंतवाडी, शिरोडा मांगेली,खूषगेवाडी,आंबोली
४ मे -मालवण,आंबोली
५ मे -देवगड,राधानगरी, रायचूर
६ मे -कोल्हापूर, इचलकरंजी,
७ मे -रत्नागिरी, सांगली, मिरज
८ मे -कऱ्हाड, जयगड, अफजलपूर
९ मे -चिपळूण, अक्कलकोट
१० मे-सातारा, पंढरपूर, सोलापूर
११ मे-महाबळेश्वर, फलटण, तुळजापूर, वाइ
१२ मे-बारामती, बार्शी, उस्मानाबाद
१३ मे -पुणे,मुळशी, दौड, लातूर,लवासा,असरल्ली
१४ मे-लोणावळा, अलिबाग, दाभाडे,पिंप्री-चिंचवड, देहू,जामखेड, आंबेजोगाई,
१५ मे-मुंबई, नवी मुंबई, कर्जत, बीड,माथेरान, राळेगण सिद्दी, सिरोंचा
१६ मे-बोरिवली, ठाणे, डोंबिवली, कल्याण, भिवंडी, बदलापूर,नारायण गाव,खोडद,अहमदनगर, परभणी, नांदेड, निर्मल
१७ मे,-नाला सोपारा, विरार,आसनगाव, अहेरी,आल्लापल्ली,
१८ मे-पालघर,कसारा, संगमनेर, अंबाड, हिंगोली, मूलचेरा
१९ मे औरंगाबाद,डहाणू,नाशिक,कोपरगाव,वैजापूर, जालना, पुसद,बल्लारशा,चामोर्शी
२० मे- चंद्रपूर, मेहकर,वाशीम,वणी,मूल
२१ मे-मनमाड,चिखली, गडचिरोली,सिंदेवाही, रोहना,
२२ मे-मालेगाव, चाळीसगाव, बुलढाणा, खोपोली, यवतमाळ, आरमोरी
२३ मे -खामगाव, अकोला , देसाईगंज, ब्रम्हपुरी,नागभीड
२४ मे-धुळे,जामनेर, शेगाव, वर्धा, उमरेड,दर्यापूर
२५ मे-जळगाव,भुसावळ, अमरावती,अंमळनेर,तेल्हारा
२६ मे -नागपूर, भंडारा, परतवाडा, चोपडा
२७ मे -नंदुरबार, शिरपुर, बुऱ्हाणपूर, परतवाडा, चिखलदरा, तुमसर,गोंदिया, सावनेर, काटोल, रामटेक
२८ मे- अक्कलकुआ,शहादा, पांढुरणा, वरुड,नरखेड,
२९ मे-बोराड, नर्मदा नगर,
३० मे – धाडगाव
३१ मे -तोरणमाळ


