बागेश्वर बाबांचे वादग्रस्त वक्तव्य मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना अमान्य
शिवाजी महाराज आणि रामदासस्वामींची कथा

नागपूर : बागेश्वर बाबांच्या वादग्रस्त वक्तव्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे. फडणवीस म्हणाले की, इतिहासात अशा प्रकारचा कुठलाच दाखला आपल्याला पाहायला मिळत नाही. महापुरुषांबद्दल अनेक लोककथा तयार होतात, वेगवेगळ्या राज्यात वेगवेगळ्या प्रकारच्या लोककथा असतात. रामायण आणि महाभारताबाबतही अनेक लोककथा आहेत. इतिहासावर किंवा परिस्थितीवर अवलंबून त्या लोककथा तयार होत असतात. मी एवढेच म्हणेल की, जो इतिहास आपण शिकलो आहे किंवा आपल्या इथे जे काही ग्रंथ उपलब्ध आहेत, त्यात अशा प्रकारचा कुठलाही दाखला नाही.
येथील नॅशनल कॅन्सर इन्स्टिट्यूट परिसरात डॉ. आबाजी थत्ते सेवा आणि अनुसंधान संस्थेच्या वतीने उभारण्यात येणाऱ्या ‘भारतदुर्गा’ मंदिराचा शिलान्यास सोहळा सरसंघचालक डॉ. मोहनराव भागवत यांच्या हस्ते पार पडला. या सोहळ्यानंतर आयोजित ‘धर्मसभे’मध्ये बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्री (बागेश्वर बाबा) यांनी छत्रपती शिवाजी महाराज आणि समर्थ रामदास स्वामी यांच्या संदर्भातील एक विधान केले. या विधानावर आता राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली असून, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावर आपली प्रतिक्रिया दिली आहे.
कार्यक्रमात बोलताना बागेश्वर बाबांनी छत्रपती शिवाजी महाराज आणि समर्थ रामदास स्वामी यांच्या भेटीचा एक प्रसंग सांगितला. ते म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराज जेव्हा युद्ध करता करता थकले, जेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांना वाटलं की आता आपण थकलोय, तेव्हा एक दिवस छत्रपती शिवाजी महाराज समर्थ रामदास स्वामी यांच्याकडे गेले आणि आपले मुकुट काढला व सांगितले की, मी अनेक लढाई लढलो, अनेक युद्ध केले, पण आता पुढे लढायचे नाहीय. तुम्ही एक दया करा की, हे मुकुट तुम्हा आता सांभाळा, हे राज्य सांभाळा. तुमच्या आदेशानेच आम्ही चाललो, मात्र आता आमच्याकडून युद्ध लढले जात नाहीय. आता आम्हाला विश्राम हवा आहे. काही दिवस आम्हाला काहीच करायचे नाही.
यावर हसत रामदास स्वामी म्हणाले की, ठीक आहे. पण एक गोष्ट मला सांगायची आहे की, तुम्ही माझे कोण आहात?, यावर छत्रपती शिवाजी महाराज म्हणाले, मी तुमचा शिष्य आहे. रामदास स्वामी म्हणाले, मी कोण आहे?, यावर छत्रपती शिवाजी महाराज म्हणाले, तुम्ही आमचे गुरु आहात. मग रामदास स्वामींनी विचारलं, मग शिष्यचं कर्तव्य काय?, यावर शिवराय म्हणाले, जे गुरु आदेश देतील. यानंतर रामदास स्वामींनी मुकुट उचलून छत्रपती शिवाजी महाराजांच्या डोक्यावर घातलं आणि म्हणाले, आजपासून माझे राज्य आहे, मी चालवणार. पण आज्ञा तुम्हाला आहे, तुम्हाला संचालन करायचे आहे, असा छत्रपती शिवाजी महाराज आणि समर्थ रामदास स्वामी यांचा किस्सा बागेश्वर महाराज यांनी सांगितला.



